Wednesday, 4 July 2018

पृथ्वीची निर्मिती म्हणजे भौतिकशास्त्र आणि   रसायनशास्त्र यांचा केवळ संयोग आहे, म्हणजेच प्रथम जीवसृष्टी निर्माण होण्यासाठीचं भौतिक वातावरण तयार झालं आणि त्यांनतर वेगवेगळ्या रसायनांचं एकमेकात मिसळण्याची प्रक्रिया एव्हढ्यानच जीवसृष्टी निर्माण झाली त्यांनंतर अब्जावधी वर्षे उत्क्रांत होत होत माणूस आज एक परिपूर्ण आणि शक्तिशाली जीव बनला आहे.
यामध्ये मानव आजपर्यंत पुष्कळ बऱ्या वाईट गोष्टींसाठी कारणीभूत ठरला आहे.
             पण मुळात  भटक्या मानवाला स्थिर आयुष्य जगण्याची इच्छा का वाटावी?
  मानवाच्या भटकंतीला विराम मिळाला तो शेती करण्याच्या शोधापासून, तो कायमचाच आजतागायत तो टिकून आहे आणि भविष्यात देखील तो राहील अर्थात याची शाश्वती देता येत नसली तरी ते पूर्णपणे नाकारून चालणार नाही.
कृषीक्रांती ही मानवजातीची शुद्ध फसवणूक होती असा दावा बऱ्याच वैज्ञानिकांकडून वारंवार केला जातो आणि तो काहीप्रमाणात योग्य देखील आहे, कारण भटकंती करणाऱ्या मानव समूहांना शेती करण्यासाठी जमीन मिळाली तिथपासून त्या जमिनीवर ते मालकी सांगू लागले ती जमीन सोडून कुठेही जाणे त्यांना नकोसे वाटू लागले म्हणजेच त्याक्षणापासून पृथ्वीवर अर्थकारणाचा पाया रचला गेला,अजून समाज व्यवस्थेविषयी ते अनभिज्ञ होते खरंतर त्यांना कुटुंबसंस्था वगैरे विषयी देखील म्हणावी तेवढी आस्था नसावी.
 परंतु भटक्या मानवांनी वर्षानुवर्षे चालवलेली शोधमोहीम इथे पूर्णपणे खंडित झाली, कृषीक्रांती ने त्या अखंड मनमोकळ्या मानवजातीला जे चिंतेच्या गर्द छायेत लोटलं ते कायमचंच.
 पण याचा अर्थ असा नाही की कृषि क्रांती च्या आधी माणूस चिंतामुक्त होता, मात्र आज कंदमुळं खाऊन किंवा एखादा प्राणी मारून आपल्याला भूक शमवावी लागेल ते मिळेल की नाही या चिंतेपेक्षा आपण पेरलेले गहू चांगले येतील का किंवा पाऊस पडेल का? ही चिंता मानवाला अधिक संकुचित वृत्ती कडे घेऊन गेली...
                  सेपिअन्स नी पूर्ण निअँडरथल जातीचा सफाया केला आणि आपली पाळंमुळं या पृथ्वीतलावर अधिक घट्ट केली त्याचप्रमाणे त्यांनी दैवी शक्तींवर अधिक विश्वास ठेवून त्या कल्पित देवाला स्वतःमध्ये सामावून घेतलं, या मागे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फायदेशीर असणारे हेतू होते.
 धर्म ही माणसानं आपल्या आधीच अस्तित्वात असणाऱ्या समूहाला आणखी स्थैर्य आणि सुरक्षितता किंवा एक साचेबद्धता आणण्यासाठी निर्मिलेली कल्पित गोष्ट आहे.
पण जर आता या काळात धर्म जर एकाएकी नाहीसे झाले असे आपण समजलो तर काय होईल किंवा खरंच तसं झालं तर प्रॉब्लेम्स संपतील का??
मुळात धर्म म्हणजे एक समूह असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांच्या मध्ये असणारी एक सामाईक गोष्ट त्या समूहामध्ये साचेबद्धता आणते त्यांना एकमेकांशी बांधून ठेवते ,तर मग धर्म गायब झाल्याच्या पुढच्या क्षणापासून काळा रंग आवडणारे, किंवा अमुक एखादा पदार्थ आवडणारे किंवा एखाद्या खेळाचे निस्सीम चाहते इत्यादी यांचा देखील एक पंथ तयार होईल म्हणजे त्यात कर्मकांड वगैरे होणार नाहीत परंतु भविष्यात ते अजिबातच होणार नाहीत याची खात्री देता येणार नाही...
                          स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि अस्तित्वासाठी कायम झगडा केलेल्या सेपिअन्सना समूहात राहणे अधिक सुखदायक वाटत आले आहे, याच मूळ स्वभावाला अनुसरून सेपिअन्स भविष्यात कोणकोणत्या गोष्टींची उकल करतील हे निश्चित सांगता येणार नाही.....

      - परेश महाजन

No comments:

Post a Comment

मानववंशशास्त्र

सर्व प्रकारच्या सुखसोईंनी आणि ज्या गोष्टींना आपण समृद्धीच्या उपस्थिततेच प्रमाण मानतो अशा गोष्टींनी परिपूर्ण आयुष्य लाभलेला अनिवासी भारतीय ...