सर्व प्रकारच्या सुखसोईंनी आणि ज्या गोष्टींना आपण समृद्धीच्या उपस्थिततेच प्रमाण मानतो अशा गोष्टींनी परिपूर्ण आयुष्य लाभलेला अनिवासी भारतीय तरुण अभ्यास करण्यासाठी भारतात येतो.
जगाची, धर्माची मूळ इथे घट्ट आहेत उत्क्रांतीच्या कचाट्यातून न सुटलेली किंवा कमी प्रमाणात अडकलेली असंख्य प्रजा व अशिक्षितता अधिक प्रमाणात असून देखील हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा जोपासण्याची तयारी अंगिकारलेल्या वनवासी प्रजेला अभ्यासण्यासाठी परदेशातील विश्वविद्यालयातील तरुणाने भारतात केवळ स्वार्थी भावनेने आदिवासींना प्रायोगिक तत्त्वावर त्यांचं परीक्षण करण्याची आकांक्षा बाळगली.
उच्च शिक्षण आणि तेही परदेशात म्हणजे अर्थातच भारतापेक्षा आधुनिक त्यामुळं मानसिक अवस्थांमध्ये त्याचं पारडं हे त्या आदिवासीं पेक्षा नक्कीच लाखो पटीने अधिक जड झालं असतं खरं तर त्याचं त्याला अप्रूप होतं.
प्रथम नाव ऐकून आणि कामाचं वर्णन राहण्याबद्दल खाण्याबद्दल ऐकल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात पुढे येणाऱ्या प्रौढ आणि कुर्ता, झब्बा वगैरे अंगावर बाळगणाऱ्या बाईचा देह येणे सहज शक्य होतं पण अर्थात प्रत्यक्ष तिला पाहिल्यानंतर आपला अंदाज चुकल्याचा त्रास खरंतर कमी आणि जगात आपल्याला माहीत नसणाऱ्या गोष्टींमध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली याचा अधिक त्रास मानवाच्या काचेसारख्या नितळ मनाला होऊ शकतो आणि त्यात काहीही गैर नाही उलट आपल्याला काहीच माहिती नाही हेच आपल्याला फक्त माहिती आहे हे छातीठोकपणे सांगणारा प्रसिद्ध ग्रीक तत्त्ववेत्ता जागतिक तत्त्वज्ञानात महत्त्वाची भर घालून अनंतात विलीन होत असतो.
मानववंशशास्त्रातील वाढ, विकास हा एका विशिष्ट साखळीने झालेला आहे आणि त्यातील काही कड्या तुटल्या आणि काही कड्या आजतागायत जमिनीत मुळं बनुन खोलवर गेलेल्या आहेत आणि त्या द्वारेच एकत्र जीवनाचा गाभा, मूलभूत सिद्धांत वगैरे शोधता येतील याचीच आकांक्षा बाळगून पुढे जाण्यात कथानायकाला स्वारस्य असते.
धर्माचा आणि अध्यात्माचा अजिबात परस्परांशी संबंध नाही आणि तो जाणून बुजून जोडून त्यातून अगणित अंधश्रद्धा निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विराम मिळालाच पाहिजे त्यातून नवीन आणि परिवर्तनीय अशा व्यवस्थेविषयी आकर्षण निर्माण होईल यातून मानव मुक्ती वगैरे अनंत लोकांनी कल्पिलेल्या गोष्टीला फलस्वरूप प्राप्त होईल हे महत्त्वाचे आणि उपयुक्तही त्या लोकांसाठीच.
नर्मदा म्हणजेच रेवा अक्षरशः वैज्ञानिक दृष्टीने निर्जीवच असणाऱ्या त्या पाण्याच्या थोड्याशा मोठ्या प्रवाहाला लोक सजीव नव्हे तर देवी मानतात ती जिवंत आहे, आमच्या सोबत आहे ते आमच्या दुःखांना तारते, आम्हाला जिवंत ठेवते आणि हे सगळं करते ते कळत नसावं पण ती जेव्हा रुद्ररूप धारण करून आपल्या दोन्ही हातांची रुंदी वाढवून त्या आदिवासींना गिळून टाकते तरीसुद्धा त्यांचा तिच्यावर असणारा अतोनात आणि दृढ विश्वास पाहून त्यांच्या मेंदूवर परंपरागत विचारांची झापड आहे, त्यांचे अज्ञान आहे, भोळेपणा आहे की आपलं तोडकं ज्ञान हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
वाघाने आपल्या डोळ्यांदेखत आपल्या भावाला मारून टाकल्याने व्यथित होऊन त्या वाघाचा क्रूरपणे बदला घेण्याचा मनाशी पक्क ठरवून देखील त्याची अडकलेल्या सापळ्यातून तिच्या लहान पिल्लांसाठी सोडून देणारा आदिवासी आणि तसं करण्यामागची त्याची भावना हीच ती साखळी मधील महत्त्वाची कडी म्हणली गेली पाहिजे, ज्यातून हजारो वर्षांपूर्वीची परंपरा, गोष्टी जिवंत राहिल्या, एकत्र पणाला पोषक वातावरण तयार झालं जिव्हाळा वगैरे काय तो हाच. अडाणी आणि एक शब्दही वाचुन न शकणाऱ्या आदिवासींच्या मनात असणारी मानवी मूलभूत मूल्यांची प्रगल्भता हे हजारो वर्षांपासून देशाला, लोकांना एकत्रपणे बांधून ठेवण्यास कारणीभूत नक्की आहे.
खरं म्हणजे आध्यात्मिक अनुभव हा धार्मिक नव्हेच धर्म हे मानवनिर्मित आहेत अध्यात्म नाही, ते तर मानववंशशास्त्राचा मूळ आहे स्वतःचा शोध तो विचार करून, भटकून मिळवण्यात काही जणांना रस असतो तर काही जणांना दैनंदिन काम करून.
जगाचे मूळ या गोष्टींमध्ये आहेत, प्रश्नांचं भांडार आणि त्याची उत्तरं शोधण्याची मानसिक तयारी या मध्येच कुठेतरी हे मूळ दडलं गेलेलं आहे आणि ते शोधण्यासाठी मानवी मानसिकतेला मोठ्या प्रमाणात प्रगल्भ करावं लागेल हे नक्की....
- परेश महाजन